भारताचे यंदाच्या दशकात ‘एसईएनए’ देशांविरुद्धच्या मालिकेत अपयश

नवी दिल्ली – भारतीय संघाला यंदाच्या दशकात सेना (एसईएनए) देशांविरुद्धच्या मालिकेत अन्य देशांच्या तुलनेत जास्त अपयश आले आहे. सेना देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश व भारत या चार संघांमध्ये भारतीय संघच जास्त अपयशी ठरला आहे. सेना म्हणजे (एसईएनए- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया). 

या दशकातील अपयश नुकत्याच भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर जास्तच चर्चिले जात होते. मात्र, मेलबर्नला विजय मिळवल्यानंतर ही चर्चा थोडी थांबली आहे. भारतीय संघ सेनामध्ये यंदाच्या मोसमात अन्य संघांच्या तुलनेत जास्त अपयशी ठरला आहे. या चार देशांविरुद्ध भारतीय संघाने यंदाच्या दशकात 37 सामने खेळले असून त्यांच्या विजयाची टक्‍केवारी केवळ 13 आहे. पाकिस्तानची 17 तर, श्रीलंकेची 15 टक्‍के सरासरी आहे.

आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील क्रिकेटच्या सुविधा अधिक व नियोजन पद्धत चांगली आहेत. प्रथमश्रेणी, एकदिवसीय व टी-20 तिन्ही क्रिकेटमध्ये त्यांना संधी मिळते. पाकिस्तानात केवळ 6 संघ प्रथम श्रेणी स्पर्धेसह एकदिवसीय व टी-20 सामने खेळतात. श्रीलंकेत तर प्रथम दर्जाच्या क्रिकेटचा दर्जा या दोन्ही देशांच्या तुलनेत कमी असूनही त्यांनी भारतापेक्षाही सरस कामगिरी केली आहे.

यंदाच्या दशकात भारताला 73 पैकी 22 डावांत धावसंख्येचा 200 चा आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात तर भारताचा डाव केवळ 36 धावांत संपला. 2014 साली भारताचा इंग्लंडविरुद्ध सामन्यात 94 धावांवर खुर्दा उडाला होता. यादरम्यान भारताने एकूण 12 मालिका खेळल्या. यातील 9 मालिकेत भारताचा पराभव झाला.

भारतीय संघाला यंदाच्या मोसमात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील त्यांच्या आव्हानालाच धोका निर्माण झाला आहे. सर्वाधिक गुण भारताच्या नावावर असूनही त्यांना नेट रनरेटमधील सुमार कामगिरीमुळे दुसरे स्थान मिळाले असून ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या कामगिरीबाबत बोलायचे झाले तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 32 कसोटी खेळताना 2 हजार 889 धावा केल्या आहेत. त्याने 11 शतके व 10 अर्धशतके फटकावली आहेत. यंदाच्या संपूर्ण वर्षात कोहलीला एकही शतक फटकावता आलेले नाही. त्याच्या नंतर मात्र भारताच्या एकाही फलंदाजाला फारसे यश मिळालेले नाही.

चेतेश्‍वर पुजाराने कोहलीच्या खालोखाल कामगिरी करताना 27 सामन्यांत 1807 तर, अजिंक्‍य रहाणेने 26 सामन्यांत 1733 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह व महंमद शमी सातत्यपूर्ण कामगिरी करत असले तरीही संपूर्ण दशकातील कामगिरी पाहिली तर भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हाच यशस्वी ठरल्याचे दिसून येते. त्याने या दशकात बळींचे शतक पूर्ण केले असून त्यासाठी त्याने केवळ 30 सामने खेळले आहेत.

रनमशीन अपयशी 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अपयश जास्त अधोरेखित होत आहे. यंदाच्या मोसमात कोहलीला एकही शतक फटकावता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या काळातील सर्वात बलाढ्य फलंदाज तसेच रनमशीन म्हणून ओळखल्या जात असलेल्या कोहलीच्या अपयशामुळे न्यूझीलंडसह अन्य महत्त्वाच्या मालिकांमध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या सामन्यातही तो शतकापासून वंचितच राहिला. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर कोहली पालकत्व रजा घेत मायदेशी परतला.

Leave a Comment