nagar | जखमी वानरास मिळाले जीवदान

राहुरी, (प्रतिनिधी): देवळाली प्रवरा येथे विजेचा धक्का बसल्याने बेशुद्ध झालेल्या वानराला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली आणि जीवनदान मिळाले. आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या लक्ष्मण बागेजवळील स्ट्रीट लाईटच्या वीजवाहक तारांमधील विजेचा धक्का लागून वानर बेशुद्ध होऊन पडले. वानराच्या पिलाला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे जीवनदान मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून वानरांची एक टोळी या परिसरात तळ ठोकून आहे. आज सकाळी एका वानराच्या पिल्लाने रस्त्यालगत असलेल्या वीजवाहक तारांवर झेप घेताच त्याला विजेचा जोराचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले. ही घटना पहात असलेल्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेऊन चिकित्सा केली असता ते वानर जखमी होऊन बेशुद्ध पडले असल्याचे लक्षात आले.

प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते भूषण महाजन, कृष्णा देठे, ऋषिकेश उंडे यांनी तत्काळ प्रतिष्ठानच्या स्वास्थ्य सेवा वाहनातून देवळालीतील पशू चिकित्सा केंद्रात घेऊन गेले. तिथे पशूवैद्य भंवर यांनी वानरावर प्रथमोपचार करून राहुरी येथील पशुवैद्यकीय केंद्रात घेऊन जाण्यास सांगितले. राहुरी येथे वानरावर वन अधिकारी वाघचौरे व पशूवैद्य पालवे यांनी उपचार करून त्यास जीवनदान दिले.शुद्धीवर येताच हे वानर आपल्या स्वभावानुसार वानर लिला करीत जवळच्या झाडावर जाऊन आरामात विसावले.