“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार” नावाचा झंझावात… एका वैचारिक चळवळीचा रौप्य महोत्सव

पुणे – लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य महोत्सवी स्थापना दिन राज्यभरात अतिशय जल्लोषात साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा केवळ निवडणुकीची बेरीज – वजाबाकी करणारा राजकीय पक्ष नसून महाराष्ट्र धर्मासाठी लढणारी ही एक वैचारिक चळवळ आहे.

राजमाता जिजाऊ मॉंसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तिमत्वाचे आदर्श विचार घेऊन वाटचाल करणारी ही चळवळ याच दिमाखात सुवर्ण महोत्सव साजरा करणार यात शंका नाही.

कोणत्याही पक्षाचा रौप्य महोत्सवापर्यंतचा प्रवास हा त्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा हा प्रवास अविस्मरणीय व प्रेरणादायी आहे. यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचूनही जायचं नाही हा संदेश आदरणीय पवार साहेबांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून संबंध महाराष्ट्राला दिला.

पवार साहेबांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते पुढे जाऊन नेते झाले, सरपंच, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक पदांवर काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेबांमुळे कार्यकर्त्यांना मिळाली. देशातील तब्बल १८ राज्यांमध्ये पक्षाचे जाळे विस्तारून पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणले. अवघ्या २५ वर्षांच्या कार्यकाळात पक्षाने तब्बल १० वर्षे केंद्रात तर १८ वर्षे राज्यात सरकार चालवण्याची किमया साधली.

मध्यंतरी काही जातीवादी, धर्मवादी शक्तींकडून आदरणीय पवार साहेबांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपवण्याचा प्रयत्न झाला. पक्षाचे नेते पळवले, पक्षाचं नाव पळवलं, पक्षाचं चिन्ह पळवलं. मात्र पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व पक्षाच्या विचारांवर दृढ विश्वास असणारी जनता कोणीही पळवून नेऊ शकत नाही हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झालं.

ज्या पक्षाला संपवण्यासाठी एक तथाकथित “महाशक्ती” काम करत होती तोच पक्ष संघर्ष करून पुन्हा एकदा दुप्पट ताकदीने उभा राहिल्याचा हा इतिहास नेहमीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा पुढील काळातही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रौप्य महोत्सवी स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विक्रम रचून हे रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोषात साजरे करूया !