‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल; नेमकं काय आहे कारण?

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा रुग्णालयात दाखल झाली आहे. मंगळवारी अचानक तिची तब्येत खालवल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या वृत्तानंतर चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

समोर आलेल्या माहिती नुसार, अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली आहे. तिला डायरियाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या आगामी ‘कमांडो’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अतिसार आणि फुड अॅलर्जीमुळे तिची प्रकृती खालावली. त्यानंतर मंगळवारी तिला आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.

सध्या अदा शर्मा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिच्या काही टेस्ट चालू आहेत. अदा शर्माच्या तब्येतीबाबत प्रवक्त्यांनी सांगितले की, अदाची 2 ऑगस्टला सकाळी अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, अदा लवकरच ‘कमांडो’ चित्रपटात दिसणार आहे. ‘कमांडो’मध्ये अदासह वैभव तत्ववादी, अमित सियाल, तिग्मांशु धुलिया, श्रिया सिंग चौधरी, मुकेश छाबरा आणि इश्तियाक खान हे कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटात अदा शर्मा अॅक्शन सीनही करताना दिसणार आहे. येत्या 11 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे.