पिंपरी | मावळ तालुक्‍याच्‍या पाऱ्याची ४० अंशांकडे वाटचाल

कान्‍हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यात उन्हाचा चटका वाढला आहे. येथील कमाल तापमान वाढ झाली असून उन्‍हाचा पारा ४० अंश सेल्सियसच्‍या समीप आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्‍या काही दिवसांत उन्‍हाचा तडका आणखीन वाढण्‍याची शक्‍यता आहे.

मावळ तालुक्‍यात दुपारी एक ते चार वाजेपर्यंत पारा ३८ ते ३९ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविला गेला. सायंकाळी सहा वाजता तापमानात फरक पडला. गेल्या दहा वर्षांतील ही कमाल तापमानाची ही नोंद झाली आहे.

उन्हाच्या वाढत्या झळांमुळे दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाजारपेठातील वर्दळ दुपारच्या वेळी रोडावते. काळजी न घेतल्‍यास तापमानातील फरक आरोग्यास हानीकारक ठरू शकतो.

खबरदारीचे उपाय केल्यास उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळू शकेल. नागरिकांनी शक्यतो अतितापमानाच्या वेळेत घराबाहेर जाण्याचे टाळावे. बाहेर पडण्यापूर्वी कॉटनचे कपडे परिधान करावेत, छत्री, टोपी, मफलर आणि गडद गॉगल्सचा वापर करावा. सोबत पिण्याचे पाणी बाळगावे. आहारात हंगामी फळे, ताक आणि सरबत जास्त प्रमाणात असल्यास डीहायड्रेशन टाळता येईल.