पुणे | मिसिंग-लिंक अजूनही मि सिं ग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या रस्त्यांना पर्यायी रस्ते १०० ते ५०० मीटर अंतराचे भूसंपादन रखडल्याने अर्धवट असल्याने हे रस्ते पूर्ण करण्यासाठी मागील वर्षी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्या अंतर्गत, महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणात ३३ रस्त्यांवर मिसिंग लिंक पूर्ण केल्या जाणार आहेत.

त्यातील १३ जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या असल्या तरी केवळ ४ ठिकाणीच रस्ते पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. तर ९ ठिकाणी पथविभागाला वेळच मिळालेला नाही. तर उर्वरीत २० ठिकाणच्या जागांंबाबत गेल्या दिड वर्षांत पालिकेच्या पथ विभागाला कोणताच तोडगा काढता आलेला नाही. हे रस्ते पूर्ण झाल्यास अनेक भागात पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. मात्र, महापालिकेच्या संथगती कारभारामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प गेल्या चार महिन्यांपासून कागदावरच आहे.

पथ विभागाकडून उदासिनता…
महापालिकेकडून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर ३३ रस्त्यांच्या मिसिंग लिंक शोधल्या आहेत. त्यात, प्राधान्याने १८ ठिकाणच्या जागांची लांबी ही ५०० मीटर पेक्षाही कमी आहे. त्यामुळे, वाहतुकीची समस्या, भूसंपादनासाठी कमी खर्च तसेच या जागा ताब्यात घेऊन तत्काळ काम सुरू करणे शक्य असल्याने या रस्त्यांवर महापालिकेने आपले लक्ष केंद्रीत केले.

त्यानंतर पालिकेच्या या भूमिकेला जागा मालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जागा ताब्यातही आल्या. मात्र, त्यानंतर जागा मालकांना मोबदला देणे, रस्त्याची आखणी करणे, रस्त्याचे काम पूर्ण करणे यासाठी पथ विभागाकडून उदासिनता दाखविली जात असल्याने हे रस्ते रखडले आहेत.

या ठिकाणी कामे रखडली कामे…
– एकलव्य महाविद्यालय ते बेंगलोर महामार्ग ( लांबी ९४ मी.)
– गुंजन चौक ते नदीपात्र रस्ता ( येरवडा) – (लांबी २४०० मी.)
– सुतारवाडी बसस्थानक ते बेंगलोर महामार्ग (लांबी १५० मी.)
– मगरपट्टा ते हनीवेल – (लांबी -१५० मी.)
– नोबेल हाॅस्पिटल ते मगरपट्टा रस्ता – (लांबी ८० मी.)
– नवले पूल ते भूमकर चौक सेवा रस्ता – (लांबी १४० मी.)
– विमाननगर विमानतळ लिंक रस्ता – ( लांबी – २०० मी.)
– काळेपडळ ते रवी पार्क ( समांतर रस्ता ) ( लांबी ३०० मी.)
– ह्युम पाइप ते सिंहगड रस्ता – ( लांबी १५० मी.)
– लेक टाऊन ते सुखसाखर नगर ( लांबी १५० मी.)
– पौड रस्ता ते कर्वे रस्ता (चितळे बंधू दुकान ) – ( २० मी.)