देशाची अर्थव्यवस्था मंदावल्याचे मोदी सरकारने केले मान्य

नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे सरकारने पहिल्यांदाच मान्य केले आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. खासगी खरेदीत झालेली घट, गुंतवणुकीतील मंद वातावरण आणि कमी झालेली निर्यात या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे अर्थमंत्रालाने म्हटले आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आपल्या एका अहवालात ही माहिती दिली असून त्यांनी सन 2018-19 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा अदांज 7.2 टक्‍क्‍यांवरून 7 टक्के इतका कमी केला आहे. गेल्या पाच वर्षातील जीडीपीचा हा नीचांक आहे. तथापी येत्या काही वर्षात भारत पुन्हा आपली आर्थिक वाटचाल वेगाने चालू ठेवेल आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था हा देशाचा लौकिक कायम राहील, असा विश्‍वासही अर्थमंत्रालयाने व्यक्त केला आहे.

सन 2018-19 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या अवधीत भारतीय रूपयाचे जे अवमुल्यन झाले आहे त्याने निर्यात क्षेत्रातील सुधारणेपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण केली आहे. तेल आयातीचा व्यवहारही मोठ्याच घाट्यात चालल्याचे या तिमाहीत दिसून आले असून त्यामुळे जीडीपीच्या तुलनेत चालू खात्यावरील तूटीचे प्रमाण वाढत गेले आहे.

Leave a Comment