‘लालबागचा राजा’ मंडळाला पालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड

मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्‍तांचे श्रद्धास्थान आहे. आणि गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या चरणी अनेक प्रकारच्या वस्तू व सोन्या-चांदीचे दागिने दान केले जात असतात. उत्सव संपल्यानंतर या मोैल्यवान वस्तूंचा लिलाव केला जातो. यंदा या लिलावातून एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम उभी राहिली असून या संपूर्ण उत्सवात या मंडळाला एकूण सहा कोटी 25 लाख रुपये मिळाले आहेत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

याच बरोबर लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान लालबागचा राजा मंडळाकडून रस्ते आणि पदपथांवर खड्डे खोदण्यात आले होते, त्यासाठी मुंबई महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला 3 लाख 66 हजारांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाकडी खांब बसवण्यासाठी पदपथावर 53 आणि रस्त्यावर 150 खड्डे खोदण्यात आले. यासाठी महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला 3 लाख 66 हजारांचा दंड ठोठावला आहे. मुंबई महापालिका रस्त्यावर करण्यात येणाऱ्या खड्यांसाठी सर्वच गणेशोत्सव मंडळाला अशा प्रकारचा दंड ठोठावते.  गणेशोत्सव संपल्यावर नियमाप्रमाणे खड्डे बुजवण्याची जबाबदारी मंडळावर सोपवली आहे. मात्र लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजवण्यात आले नाहीत. मंडळाने सन 2022 मध्ये 203 खड्डे खोदले होते. हे खड्डे वेळीच बुजवले नसल्याने पालिकेने मंडळाला 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.