मेक्सिकोतील महापौर महिलेची गोळ्या झाडून हत्या

कोटिजा (मेक्सिको) – मेक्सिकोतील मिचोकन प्रांतातील कोटिजा शहराच्या महापौर योलांदा सॅन्चेझ फिगुएरोवा यांची सोमवारी गोळ्या  घालून हत्या करण्यात आली. मेक्सिकोच्या अध्यक्षपदी क्लॉडिया शेनबॉम या पहिल्या महिलेची निवड झाल्याचा आनंद देशभरात साजरा केला जात असतानाच ही हत्या झाली आहे.

सॅन्चेझ फिगुएरोवा या आपल्या मित्राबरोबर व्यायामशाळेतून घरी परतत असताना पांढऱ्या व्ॅनमधून आलेल्या हल्लेखोरांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आणि नंतर उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांचा शोध लगेच सुरू करण्यात आला आहे.

सॅन्चेझ फिगुएरोवा यांच्यावर यपूर्वी देखील प्राणघातक हल्ला झाला होता. २०२३ मध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि ३ दिवसांनी त्यांची सुटका केली गेली होती. मेक्सिकोमध्ये महिलांवरी अत्याचारांचे प्रमाण लक्षणीय आहे. नव्याने अध्यक्षपदी निवडून आलेल्या क्लॉडिया शेनबॉम यांनी आपल्या समोरच्या आव्हानांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे आव्हान प्राधान्याचे असल्याचे म्हटले होते. त्याचेच उदाहरण लगेचच समोर आले आहे.

शेनबॉम यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा सातत्याने उल्लेख देखील केला होता. मेक्सिकोतील कायद्यांच्या आधारे या अत्याचारांच्या घटनांना रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले असल्याचे शेनबॉम यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले होते आणि अधिक कडक कायद्यांची आवश्‍यकता असल्याच्या मुद्यावर भर दिला होता.

निवडणूक प्रक्रीयेदरम्यान हिंसाचाराच्या अशा घटना देखील घडल्या होत्या. टोळ्यांकडून अपहरण, हत्या आणि बलात्काराच्या घटनांचे प्रमाण चिंताजनक स्थितीत पोचले आहे. यापैकी बहुतेक गुन्ह्यांचा छडा लावला जाऊ शकलेला नाही. यामुले देशातील महिलांमध्ये भीती आणिअसुरक्षिततेची बावना वाढीला लागली आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची ग्वाही क्लॉडिया शेनबॉम यांनी दिले आहे. त्या १ ऑक्टोबरला अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.