सहा इंच उंचीच्या सापळ्याचे रहस्य अखेर उलगडले

वॉशिंग्टन : अंतराळात परग्रहवासीय म्हणजेच एलियन अस्तित्वात आहेत का याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. यावर परस्पर विरोधी उलटसुलट असे दावेही केले जातात. 2003 मध्ये चिलीमध्ये अशाच प्रकारचा एक फक्त सहा इंच उंचीचा सापळा उत्खननात सापडला होता तो सापळा एखाद्या एलियनचा असावा, अशी आत्तापर्यंत चर्चा केली जात होती. मात्र संशोधकांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

तो कमी उंचीचा सापळा हा परग्रहवासीयाचा नव्हता तर पृथ्वीवरीलच तो जीव होता असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. चिलीमधील आटाकामा वाळवंटात उत्खननात हा अतिशय कमी उंचीचा सापळा सापडला होता. शास्त्रज्ञांनी त्या सापळ्याला ‘ऍता’ असे नाव दिले होते. तो सापळा फक्त सहा इंच उंचीचा असला तरी त्याची संपूर्ण वाढ झाल्याचे दिसत होते. त्याची डोक्याची कवटी मोठी असल्यानेच तो एखाद्या परग्रहवासीयाचा सापळा असावा, अशी शंका पहिल्यांदा व्यक्त करण्यात येत होती.

जेव्हा वैद्यकीय तज्ञांनी या सापळ्याचे पृथक्करण केले तेव्हा त्याचे वय 6 वर्षे होते असे लक्षात आले. स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातील डॉक्टर गॅरि नोलोन यांनी या सापळ्याचे विशेष संशोधन केले तेव्हा त्या सापळ्यामध्ये त्यांना मानवी डीएनएच आढळले. याचाच अर्थ हा सापळा कोणत्याही परग्रहवासीयाचा नव्हता असे त्यांनी सिद्ध केले. अत्यंत कमी वाढ झालेल्या एखाद्या कुपोषित लहान मुलाचा तो सापळा होता असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तरीही त्या सापळ्याचा एवढा कमी आकार असण्याचे निश्चित कारण काय? याचे अजून संशोधन करण्यात येणार आहे.