शांततेचे नोबेल विजेत्या लेखकाला झाली 10 वर्षांची शिक्षा

मिन्सक, (बेलारुस) – शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते बेलारुसचे लेखक ऍलेस बियालियात्सकी यांना स्थानिक न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ऍलेस बियालियात्सकी यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत. बियालियात्सकी हे वेसना ह्युमन राइटस सेंटर नावाने एक संघटना चालवत आहेत. ही संघटना नोंदणी झालेली नाही.

या संस्थेचा निधी युरोपीयन आर्थिक संघटनेच्या सीमाशुल्क विभागाच्या सीमेपलिकडे पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या या व्यवहारांचा हेतू देखील स्पष्ट करण्यात आलेला नाही. बेलारुसच्या गुन्हेगारी विषक कायद्यांतर्गत ही कृती गंभीर गुन्हेगारीची असल्यामुळे त्यांना दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांना 65 हजार डॉलरचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

बियालियात्सकी यांना 2011 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर करचुकवेगिरीच्या आरोपाखाली त्यांना नोव्हेंबरमध्ये साडे 4 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. जून 2014 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात त्यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले.