जगभरातील करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर

ब्रिटन बनले युरोपमधील उद्रेकाचे केंद्र
लंडन : जगभरातील करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहचली आहे. त्या विषाणूने सर्वांधिक जीवितहानी अमेरिकेत झाली आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनचा क्रमांक लागला आहे. त्यामुळे युरोप खंडातील करोना उद्रेकाचे केंद्र आता ब्रिटन बनल्याचे चित्र आहे. जगभरातील 212 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्याचा सर्वांधिक तडाखा अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील बाधित आणि बळींची संख्या जगात सर्वांधिक आहे. जगभरातील करोनाबाधितांची संख्या 37 लाखांच्या घरात पोहचली आहे.

त्यातील एक-तृतीयांश म्हणजे 12 लाखांहून अधिक बाधित एकट्या अमेरिकेत आहेत. त्या देशात करोनाने आतापर्यंत 70 हजारांहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. खंडनिहाय विचार करता करोनाचा सर्वांत जास्त फैलाव युरोपमध्ये झाला आहे. त्या खंडातील जीवितहानीबाबत आता ब्रिटनने इटलीला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील मृतांची संख्या 32 हजारांवर पोहोचली आहे. तर इटलीत 29 हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. स्पेन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 25 हजारांहून अधिक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

मागील वर्षीच्या अखेरीस चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूने संपूर्ण जगालाच विळखा घातला. बेल्जियम, ब्राझील, जर्मनी आणि इराण या देशांत करोना संसर्गामुळे 6 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. चीनमधील मृतांचा आकडा 4 हजार 633 वर स्थिरावला आहे. त्या देशातील करोनाचा फैलाव नियंत्रणात आल्याची सध्याची स्थिती आहे.

मात्र, इतर देशांत करोनाचा कहर कायम असल्याने चिंतेचे सावट अजून हटलेले नाही. अर्थात, जगभरातील एक-तृतीयांश म्हणजे 12 लाखांहून अधिक रुग्ण करोनामुक्‍त ठरल्याची बाब जगाला दिलासा देणारी आहे.

Leave a Comment