राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येने हजाराचा टप्पा केला पार

मुंबई : देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद आहे. आता यात आणखी एका गोष्टीची नोंद करण्यात येत आहे ती म्हणजे कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची…कारण महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 113 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढला आहे. त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस दलातील चार आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत. दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजारांपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईत 13 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.

Leave a Comment