नीट परीक्षेसाठी मुलींची संख्या दोन लाखांनी जास्त

नवी दिल्ली – वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट)ही प्रवेश परीक्षा सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या सुमारे दोन लाखांनी जास्त आहे. करोना संसर्ग आणि लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी गेल्या पाच वर्षांत नीट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

खुला गट, ओबीसी, एसी, एसटी अशा सर्वच वर्गातून मुलांपेक्षा नीटसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी नीट परीक्षा देणे बंधनकारक असते.

त्यामध्ये बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस),
बॅचलर ऑफ डेन्टल सर्जरी (बीडीएस), बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसीन अँड सर्जरी
(बीएएमएस), बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसीन अँड सर्जरी (बीएसएमएस), बॅचलर ऑफ युनानी मेडिसीन अँड सर्जरी (बीयूएमएस), बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसीन अँड सर्जरी (बीएचएमएस), विविध वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (एच) नर्सिंग कोर्सेस.

गेल्या पाच वर्षांत नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या मुलींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाच वर्षांमध्ये मुलींची संख्या 40.8 टक्‍क्‍यांनी वाढलेली आहे.

2019                       2020                      2021
मुली            8,38,065               8,80,843              9,03,508
मुलगे         6,80,414               7,16,586               7,11,196

नीट परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या सुमारे दोन लाखांनी जास्त आहे. मात्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा या राज्यांत मात्र अजूनही नीट परीक्षेला बसणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे.

या परीक्षेसाठी हिंदी भाषा माध्यम स्वीकराणाऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढलेली आहे. 2017 मध्ये हिंदी भाषा स्वीकारणाऱ्यांची संख्या 1.2 लाख एवढी होती यंदा ती 2.28 लाखांवर गेली आहे.

अन्य प्रादेशिक भाषा स्वीकारण्याऱ्यांच्या संख्येतही हळूहळू वाढ होत आहे. सुमारे 50 हजार जणांनी नीट परीक्षेसाठी गुजराती तर 35 हजार जणांनी बंगाली भाषा स्वीकारलेली आहे. 20 हजार जणांनी तमीळ भाषा स्वीकारल आहे तर 2915 जणांनी मराठी भाषा माध्यम म्हणून स्वीकारली आहे.