भारतातील चाचण्यांचे प्रमाण अजूनही कमीच

हैदराबाद: करोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, यासाठी लॉकडाऊन ही एक तात्पुरती उपाययोजना आहे. भारतातील चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी ज्या देशांमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, अशा अन्य काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही कमीच आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जगभरात सद्यस्थितीत कोविड विरोधात 28 लसींसाठी मानवी चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यापैकी पाच लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. तर जगभरात 150 उमेदवारांवर वैद्यकीय पूर्व चाचण्याही सुरू आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या एका वार्तालापादरम्यान सत्रात सांगितले.

एकूणच भारत, जर्मनी, तैवान, दक्षिण कोरिया, जपानसारख्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही देशांच्या तुलनेत चाचणीचे प्रमाण खूपच कमी आहे. अगदी अमेरिकेतदेखील मोठ्या संख्येने लोकांची चाचणी होत आहे. त्यामुळे “टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट’नुसार प्रति लाख किंवा प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे किती चाचण्या दरदिवशी करायच्या याचा सर्वोच्च टप्पा प्रत्येक सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्‍चित करायला
हवा.

पुरेशा चाचण्यांशिवाय विषाणूबरोबर लढणे म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या. चाचण्यांमध्ये 5 टक्के पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळत असेल, तर सध्या देशात होत असलेल्या चाचण्या पुरेशा नाहीत. जिल्हा रुग्णालयांमध्ये बेड, अलग ठेवण्याच्या सोयीसुविधा, आयसीयू आणि ऑक्‍सिजन पुरवठ्यांच्या उपलब्धतेवर शासनांकडून सातत्याने लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे, असेही स्वामीनाथन म्हणाल्या.

Leave a Comment