कांदा प्रश्न पु्न्हा पेटला; नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार, उपबाजार समितीत कडकडीत बंद

नाशिक – नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर (Onion farmers) आता कांदा व्यापारी (Onion trader) वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत (market committee) कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) मार्फत सुरू असलेली दोन केंद्रही बंद असल्याने शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

नाशिकला कांदा प्रश्न नवीन नाही. गेल्या काही महिन्यात सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अनेक आंदोलन पहायला मिळाली. सुरवातीला केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाला होता. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता कुठे कांदा लिलाव सुरु होते, तोच आता कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.

तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान –
एकीकडे दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.