करोनाविरुद्ध लढण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचाही सहभाग महत्त्वाचा

पुणे – करोनाविरुद्धच्या या लढाईत आपण नियोजनपूर्वक पद्धतीने जात आहोत. करोना प्रतिबंधासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. खासगी डॉक्‍टरांचाही यातील सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पुण्यातील खासगी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्‍टर्स यांच्याशी संवाद साधला. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदीसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले की, करोनाच्या उपचाराबाबत प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे. जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थित संकलन करून प्रक्रिया करण्याच्या दृष्टीनेही आपला प्रयत्न आहे. तसेच खासगी डॉक्‍टर्सनी त्यांचे दवाखाने सुरू ठेवणे गरजेचे आहे. करोनाव्यतिरिक्तदेखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment