पुणेकरांनी अखेर करून दाखवले; पर्यावरण जपले, कृत्रिम हौदात गणेश मूर्ती विसर्जनाला पसंती

पुणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांनी आगळा-वेगळा आदर्श घालून दिला आहे. शहरात पाच दिवसांत तब्बल 1 लाख 13 हजार 92 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यातील 71 हजार 65 मूर्तींचे विसर्जन लोखंडी टाक्‍यांच्या कृत्रिम हौदांत करण्यात आले आहे.

राज्यशासनाने यंदा “पीओपी’च्या मूर्तींना मान्यता दिलेली आहे. पण, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास महापालिकेने मनाई केली आहे. मात्र, काही ठिकाणे वगळता पुणेकरांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. तर अनेक पुणेकरांनी विसर्जन न करता महापालिकेने “पुनरावर्तन’ प्रकल्प तसेच मूर्ती संकलन केंद्रावरही मूर्ती दिल्या आहेत.

फिरत्या हौदांकडे पाठ

महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी लोखंडी टाक्‍यांची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतरही प्रशासनाने आयत्यावेळी सुमारे 150 फिरत्या हौदांसाठी दीड कोटी रुपयांची निविदा काढली. मात्र, त्याकडे पुणेकरांनी पाठ फिरवली आहे. आतापर्यंत फक्‍त 4 हजार 445 गणेशमूर्तींचे विसर्जन या फिरत्या हौदांमध्ये झाले आहे. दरम्यान, याबाबत क्षेत्रीय कार्यालयांनी या हौदांचे मार्ग तसेच माहितीबाबत जागृतीच केलेली नाही. या हौदांवर स्पीकर यंत्रणा नसल्याने ते कधी येतात आणि कधी जातात, हे कळतच नाही. परिणामी, हौद दिसले तरच नागरिक मूर्ती विसर्जन करत असल्याचे चित्र आहे.

निर्माल्याचे होणार खत
पालिकेने आतापर्यंत सुमारे 137 टन निर्माल्य संकलन झाले आहे. या निर्माल्याचे खत केले जाणार असून ते शेतकऱ्यांना मोफत देण्यात येते. यंदा निर्माल्य संकलनात लक्षणीय वाढ झालेली आहे. हे निर्माल्य नदीत अथवा कचऱ्यात न टाकता त्याचे पावित्र राखावे तसेच नदी प्रदूषण टाळावे, यासाठी महापालिकेकडून जनजागृती केली जाते.

अशी आहे आकडेवारी
एकूण मूर्ती विसर्जन  -1 लाख 13 हजार 92
लोखंडी टाक्‍यांमध्ये  – 71 हजार 065
बांधीव हौद – 21 हजार 372
मूर्ती संकलन – 16 हजार 201
फिरते हौद  – 4 हजार 454