तिच्या शोधात मदत ठरलेल्या 5 जणांचा पोलीस आयुक्तांनी केला सत्कार, दिले 1 लाखाचे पारितोषिक

पुणे – आई रागावली म्हणून बारा वर्षाची मुलगी नांदेड सिटी येथून १८ एप्रिल रोजी रागाने घरातून निघून गेली. तिला शोधण्यासाठी पोलिसांबरोबर अनेकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तिच्या शोधासाठी महत्वाचे ठरणाऱ्या ५ जणांचा सोमवारी (दि.२२) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सत्कार केला असून त्यांना विभागून १ लाखाचे बक्षीस दिले आहे.

नांदेड सिटी येथे राहणारी १२ वर्षांची एक मुलगी घरातून निघून गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत तिचा पत्ता लागत नसल्याने पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिच्या ‘मिसिंग’ची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याचे गांभीर्य ओळखुन मुलीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस अधिकारी यांना मुलीचा शोध घेण्याचा सुचना दिल्या होते.

शरद घोडके यांनी ही मुलगी केसनंद फाटा, वाघोली येथे वडापाव खाताना पाहिलेचे माहिती दिल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः घटनास्थळी गेले होते. यावेळी आयुक्तांनी हरवेलला मुलीची माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते. पाहता-पाहता हजारो पुणेकरांनी ‘मिसिंग’ची इमेज व्हॉट्सअप स्टेटसला ठेवली आणि अखेर त्या स्टेटसमुळेच ती रांजणगावातील मंदिराजवळ असल्याचा सुगावा लागला होता.

तिच्या शोधासाठी महत्वाचे ठरलेले शिवाभाऊ पासलकर, शरद मंजाबापु घोडके, संभाजी अशोक सातव, युवराज इरभान वानखेडे, संजय पाटीलबुआ गाडे यांचा आयुक्त अमितेश कुमार यांनी सत्कार केला असून त्यांना विभागून १ लाखाचे बक्षीस दिले आहे. यावेळी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची उपस्थिती होती.