मास्टरमाईंडपर्यंत लवकरच पोलीस पोहोचणार

पुणे – कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड सध्या दुबईत असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून वर्तविला जात आहे. दहा दिवसांपूर्वी इंटरपोलने भारतातील रुपे कार्डमार्फत पैसे काढणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंड विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली. त्यामुळे लवकरच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर ही नोटीस बजावली आहे.

सायबर चोरट्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीच (सर्व्हर)चा प्रॉक्सी स्वीच उभारून 28 देशांतून एकाचवेळी एटीएममधून 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले.

मास्टरमाईंड मूळचा मुंब्रा येथील राहणारा असून त्याने भारतातील विविध शहरांमधील एटीएम सेंटरमधून जे पैसे काढले गेले, त्यांना क्लोन केलेले कार्ड व पासवर्ड पूरविण्याचे काम केल्याचे तपासात समोर आले.

याबाबात आर्थिक व सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, मागील सहा ते सात महिन्यांपेक्षा अधिककाळ आम्ही इंटरपोलशी संपर्कात असून त्यांनी या प्रकरणातील भारतातील सर्व व्यवहारामागील मुख्य सुत्रधाराच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस काढली आहे.

सध्या तो दुबईत असल्याचे सांगितले जात आहे. हॉंगकॉंगमधील बॅंकेत गोठविले गेलेल्या 11 कोटी रुपयांपैकी 5 कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment