दि पूना मर्चंटस्‌ चेंबरच्या लाडू, चिवडा विक्रीस बुधवारपासून प्रारंभ

प्रभात वृत्तसेवा पुणे – दि पुना मर्चंट्‌स चेंबरतर्फे शहर व परिसरातील गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी , या हेतूने रास्त भावात चिवडा आणि बुंदीचे लाडू विक्री मागील अनेक वर्षांपासून करण्यात येते. यावर्षी येत्या बुधवारपासून (दि. 27) उपक्रमाची सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स उदघाटन समारंभ होणार आहे. चेंबरच्या या उपक्रमाची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.

तेल, साखर, शेंगदाणासह विविध वस्तुंच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीसुधा प्रति किलो 144 रुपये भावाने लाडू आणि चिवड्याची विक्री होणार आहे. दि पूना मर्चंटस्‌ चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिली. त्यावेळी उपाध्यक्ष अशोक लोढा , सचिव विजय मुथा , सहसचिव अनिल लुंकड , माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले उपस्थित होते. गेल्या वर्षी लाडू, चिवड्याची विक्री 130 रुपये किलो भावाने झाली होती.

पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यश लॉन्स , बिबवेवाडी येथे अहोरात्र लाडू व चिवडा बनविण्याचे काम सुरु राहणार आहे . कोणतीही शासकीय मदत न घेता चेंबरकडून हा उपक्रम राबविला जातो. यास पुणेकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो.

या चौदा ठिकाणी होणार लाडू, चिवड्याची विक्री
दि पूना मर्चंटस्‌ चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन , शंकरशेठ रोडवरील ओसवाल बंधु समाज कार्यालय, जयश्री ऑईल ऍण्ड शुगर डेपो ( कोथरुड ) , आगरवाल सेल्स कॉर्पोरेशन ( कर्वेनगर ) , नरेंद्र इलेक्‍ट्रीकल ( एस.पी. कॉलेज समोर , टिळक रोड ) , भगत ट्रेडर्स ( सिंहगड रोड ) , आझाद मित्र मंडळ ( पुषमंगल कार्यालय , बिबवेवाडी ) , योगी रद्दी डेपो ( अरण्येश्वर ) , कुवाड कोठारी सप्लाय कंपनी ( कर्वेनगर ) , व्हि एन . एंटरप्राईजेस ( पद्मावती मंदीरासमोर ) व अर्बन बाझार ( सिंहगड रोड ) , श्री साई सामाजिक सेवा ( कसबा पेठ ) , पवन ट्रेडर्स ( चंदननगर ) , श्रीराम जनरल स्टोअर्स ( चिंचवड )