विज्ञान युगात टपाल पेटी गायब

सुख-दुःखाशी अतूट नाते सांगणारी टपाल पेटीबाबत होती आस्था 

सोनई  – विज्ञानाच्या युगात व कॉम्प्युटर, मोबाइल क्रांतीमुळे टपाल पेटी आता अडगळीत पडली आहे. टपालदिनानिमित्त आता फक्त या टपाल पेटीच्या आठवणींना आता उजाळा देण्यात येत आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखाशी अतूट नाते निर्माण करणारी टपाल पेटी आता अडगळीत पडली आहे.

आजच्या विज्ञानयुगात टपालची किंमत जरी कमी झाली, तरी काही वर्षांपूर्वी पोस्टमन असा आवाज व त्याचबरोबर विशिष्ट प्रकारे वाजवलेली सायकलच्या घंटीचा आवाज ऐकला की न घरातील माणसं बाहेर यायची. विशेष करुन ज्या घरातील पुरुष मंडळी परगावी आहेत, त्या घरातील महिला पोस्टमनची अगदी आतुरतेने वाट पहायच्या. मनिऍर्डरचे पैसे हातात पडल्यावरचा आनंद काही वेगळाच असायचा.

कोणत्या नातेवाईकाचे लग्न ठरले, कोण आजारी आहे, कुणाला नोकरी लागली, कुणाचे निधन झाले किंवा अहो तुमची तार आली असं ऐकलं की काही तरी बरं वाईट झालं या शंकेने मन कासावीस व्हायचं. या सगळ्या प्रश्‍नांशी संबंधित असणारा व्यक्ती म्हणजे पोस्टमन संपूर्ण गावाशी तोंडओळख असणारा पोस्टमन असो की आपण लिहिलेल पत्र वेळेवर पोहोचावे म्हणून टपालपेटीच्या पाया पडून टपाल टाकण्यासाठी असणारी लाल टपाल पेटी असो, दोघेही आता दिसेनासे झालेत.

पूर्वी मोठ्या गावांत पोस्टमन येण्याची वेळ ठरलेली असायची. परंतु लहान गावात आठवड्यातून एक-दोन वेळा तो यायचा. पण तो कधीही आला तरी बरेच जण त्याची वाट पाहायचे. राखी पौर्णिमा, भाऊबीज यावेळी तर हमखास पोस्टमनला महत्त्व असायचे. मोबाइल युगात टपालचे महत्त्व कमी झाले, तरी अजूनही बऱ्याच गोष्टी टपालखात्यावरच अवलंबून आहेत, हे विसरून चालणार नाही. काही वर्षांपूर्वी सोनई गावात चार ठिकाणी टपाल पेट्या होत्या. पण आता एकही पेटी सोनईगावात दिसत नाही.

सोनई टपाल कार्यालया अंतर्गत सोनई गाव व बारा वाड्या असा मोठा परिसर आहे. जवळपास चाळी सहजार लोकसंख्येच्या कार्यालयात केवळ दोनच पोस्टमन आहेत. या पोस्टामध्ये रोज सरासरी पाचशे ते सहाशे टपाल येतात व सोनई पासून असणाऱ्या वाड्या सहा ते सात किलोमीटरवर आहेत. तेथेही टपाल पेटी नाही. टपाल पाठवायचं म्हटल्यावर थेट सोनईतील टपाल कार्यालयातच जावे लागते. सोनई गावात देखील आता किमान दोन-तीन टपाल पेट्या बसविण्याची मागणी होत आहे.

शासनाचेही खात्याकडे दुर्लक्ष

पोस्ट बॅंक, बचत खाते, मुलीच्या नावाने कन्यादान योजना, अशा विविध योजना राबविल्या जातात. पण तरुण पिढी मात्र टपाल खात्यापासून दुरावत चालली आहे. कारण टपालखात्याच्या सर्व सोयी मोबाइलमध्ये मिळत आहेत, तसेच शासन देखील टपाल खात्याकडे फारसे लक्ष देत नसल्याने त्यांची गरजही कमी झाली आहे.

Leave a Comment