शहरात अस्थमाच्या आजाराचे प्रमाण वाढतेय

पुणे – गेल्या वर्षीच्या तुलनेत पुणे शहरात अस्थमाच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कमी वयातच दम्याचा आजार होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये लहान मुलांसह प्रौढांमध्ये अस्थमाच्या आजारांमध्ये सुमारे 45 टक्‍के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील वाढते प्रदूषण, हवेतील पदार्थकण, परागकणांचे वाढते प्रमाण, धूम्रपान, सकस आहाराचा अभाव, अनुवंशिकतेमुळे अस्थमांच्या आजारांत दरवर्षी वाढ होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

अस्थमा हा एक दीर्घकाळ राहणारा आजार आहे. शरिरातील वायूमार्गाला सूज येते आणि वायूमार्ग निमुळता होतो, ज्यात काळानुरूप बदल होऊ शकतो. पुण्यातील स्थानिक डॉक्‍टर्सकडे अस्थमा किंवा श्‍वसनमार्गाशी संबंधित सुमारे 65 रुग्ण दररोज येत असल्याचा अंदाज आहे. लहान मुलांमधील अस्थमाचे प्रमाण वाढत आहे.

पुण्यातील डॉक्‍टरांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातील अस्थमाच्या रुग्णांच्या आजारात सुमारे 45 टक्‍के वाढ झाली आहे.

आपल्याला अस्थमा आहे ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये. अस्थम्यावर शक्‍य तितक्‍या लवकर आणि योग्य औषधोपचार म्हणजे इनहेलेशन थेरपी करावी. अस्थमाचे निदान लवकर झाल्यास त्यावर उपचार तातडीने सुरु करणे शक्‍य होते आणि आजार नियंत्रणात ठेवणे शक्‍य होते.
– डॉ. बाळासाहेब पवार, छातीरोग तज्ज्ञ

Leave a Comment