बैलांना सजवून रब्बीच्या पेरणीची लगबग

वीसगाव खोरे : भोर तालुक्‍यातील वीसगाव खोऱ्यात रब्बी पिकाच्या पेरणीला वेग आला असून, यासाठी बळीराजा आपल्या बैलांना सजवून, त्यांची पूजा करून पेरणीसाठी त्यांना सज्ज करीत असताना दिसत आहे.

भोर तालुक्‍यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीला वेग आला आहे. यासाठी या परिसरात बैलांचा वापर केला जातो. मात्र, ही पेरणी दिवाळीनंतर होत असल्याने या पेरणीसाठी बैलांना सजवून तयार केले जात आहे.

दिवाळी आधीपर्यंत या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. खरीपाची पिके चांगली आली होती; पण या पावसामुळे ही पिके धोक्‍यात आली होती. मात्र, नंतरच्या काळात पाऊस थांबल्यावर पिका काढणीला वेग आला होता.

यानंतर पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करून घेतली आहेत. आता शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी पेरणीसाठी पावसाच्या ओलाव्याच्या वाफशावरच चाढ्यावर मूठ धरली आहे.