पाऊस रेंगाळणार

पुणे – यंदा भरभरून देणाऱ्या मोसमी पावसाचा मुक्‍काम आणखी वाढणार आहे. साधारणत: सप्टेंबरअखेर भारतातून परतणाऱ्या मान्सूनचा प्रवास यंदा 5 ऑक्‍टोबरनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर मान्सून पूर्णपणे देशाबाहेर 15 ऑक्‍टोबर नंतरच जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

देशात मान्सूनचा मुक्काम चार महिन्यांचा असतो. सप्टेंबरअखेर मान्सून केरळमार्गे परततो, पण, यंदा हा प्रवासच सुरू झालेला नाही. राजस्थानातून पाऊस काढता पाय घेतो. मान्सूनच्या काळात पाऊस पडण्यासाठी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे महत्त्वाचे असते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मान्सूनच्या कालावधी मध्ये ही क्षेत्र निर्माण होत असतात. त्याचा परिणाम हा देशातील पावसावर होत असतो. नुकताच बंगालच्या उपसागरात “हिक्का’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले होते. ते ओमानच्या दिशेने सरकल्याने त्याचा परिणाम फारसा भारतावर जाणवला नाही.

सध्या दक्षिण महाराष्ट्रातील किनारपट्टीचा भाग आणि गोवा, कर्नाटक आणि दक्षिण गुजरात क्षेत्रात हवेचा चक्रावात निर्माण झाला आहे. जो समुद्र सपाटीपासून 7.6 मीटर परिसरात पसरला आहे. यामुळे गुजरात कोकण आणि गोवा क्षेत्रात पावसाची शक्‍यता आहे.

पुन्हा पावसाचा अंदाज
हवेच्या चक्रावातमुळे गुजरात कोकण आणि गोवा क्षेत्रात पावसाची शक्‍यता आहे. स्कायमेट संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे, की हवामानाची ही स्थिती आगामी 48 तास अशीच राहणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

Leave a Comment