राजकारणातून बाहेर पडण्याची अनेकांची तयारी; पूर्व हवेलीच्या पट्ट्यांतील अनेक मातब्बर नेत्यांनी व्यक्‍त केली भूमिका

महादेव जाधव

कोंढवा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट झाल्याने पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्‍त केली आहे. आजपर्यंत कायम विरोधात राहुन काम केलेले असताना आता एकत्र येऊन कसे काम करायचे? असा प्रश्‍न स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे. पूर्व हवेली तालुक्‍यात आगामी निवडणुकामंध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच दादा-साहेब या गटांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. यातून काहींनी पक्षातून तर काहींनी राजकारणातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाल्याने पक्षाचे प्राबल्य असलेल्या पूर्व हवेली तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, माजी सरपंच व आजी-माजी पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. दाद गटात की साहेबांच्या गटात जायचे, याबाबत कोणताही कार्यकर्ता, पदाधिकारी उगडपणे भूमिका घेत नसून अनेक जण परीस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
फुरसुंगी, उरुळी देवाची, हांडेवाडी, होळकवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे.

याच भागातुन लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मोठे मताधिक्‍य मिळते. आता, राष्ट्रवादीत दादा आणि साहेबांचा असे गट पडल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर, अजित पवारांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गटही आहे. साहेबांबरोबर गेलो तर दादा काय म्हणतील आणि दादांबरोबर गेलो तर ताई काय म्हणतील? या विचाराने अनेकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.

“भावी नगरसेवक’ भावीच राहणार…

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे,कारण, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार) एकत्र आल्याने महायुतीत कोणाच्या वाट्याला कोणती जागा येणार, या अंदाजानेच इच्छुकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तीघांमधुन एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने गेल्या तीन-चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे “भावी नगरसेवक’ आता “भावी’च राहणार अशी चर्चा नागरीकांमध्ये रंगली आहे.