उत्‍तरकाशीतील बचाव मोहिम लांबली ! खोदकामात लोखंडी सळ्यांचा अडथळे.. ऑगर मशीनमध्‍ये सतत बिघाड

उत्‍तरकाशी – उत्तरकाशीतल्या (Uttarkashi) सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात असताना बचाव मोहिम काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. अवघ्या १५ मीटरचे खोदकाम बाकी असून बुधवारी मध्यरात्रीपासून खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. यामुळे बोगद्यात (tunnel rescue) अडकून पडलेल्‍या ४१ मजुरांचा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम आहे.

खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. खोदकामासाठी मागवलेल्या अमेरिकन ऑगर मशीन सतत बिघडत असून आज दुपारीदेखील ही मशीन बिघडली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मशीन दुरुस्त करण्यासाठी दिल्लीहू तज्ज्ञांचे पथक उत्तरकाशीत दाखल झाले आहे.खोदकाम करून ३२ इंच रुंदीची नलिका (पाइप) टाकून या मजुरांना नलिकेच्या मार्गाने बाहेर काढले जाणार होते. परंतु, पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून (२३ नोव्हेंबर) कोणतीही प्रगती झालेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेही या बातमीची पुष्टी केली आहे.

एनडीएमएच्‍या अधिका–यांनी सांगितले की, आत अडकलेल्‍या सर्व ४१ कामगारांची प्रकृती स्थिर आहेत. त्‍यांना सर्व प्राथमिक गोष्टी पाठवल्या जात असून कामगारांचे नातेवाईकही त्‍यांच्‍याशी संवाद साधत आहेत. जिथे बचाव कार्याचा प्रश्न आहे, तिथे काही समस्या भेडसावत आहेत. ऑगर मशीनमध्ये बिघाड झाला असून त्याचा काही भाग आतमध्‍येच आहे.

यासाठी भारतीय वायुसेनेद्वारे एअरलिफ्ट केलेल्या ऑगर मशीनचा तो भाग बाहेर आणण्यासाठी प्रगत यंत्रसामग्री आवश्यक आहे. तो भाग लवकरच बाहेर काढून येत्या एक ते दोन दिवसांत ड्रिलिंगची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती एनडीएमए सदस्यांनी दिली.

एक्‍सचेंजची स्‍थापना
सिल्क्यरा बोगद्यापासून 200 मीटर अंतरावर एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सहा इंच रुंद पाइपद्वारे उभारण्यात आलेल्या संपर्क यंत्रणेद्वारे अडकलेले कामगार आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संपर्क साधला जात आहे.या पाईपमधून एंडोस्कोपिक कॅमेरा देखील पाठविण्‍यात आला आहे. ज्यामुळे बचाव कर्मचारी तेथील परिस्थितीचा अंदाज घेवू शकतील.

बोगद्यात अडकलेले सर्व ४१ कामगारांची प्रकृती स्थिर आणि सुरक्षित आहेत. मात्र, सिल्क्यरा बोगद्यातील बचाव मोहिम तांत्रिकदृष्ट्या जटिल बनत आहे. पूर्वी फारशी गुंतागुंत नव्हती. आम्ही टेकड्यांवर इतर बाजूंनी बचाव कार्य करत आहोत. जेव्हा तुम्ही पर्वतांवर काही करता तेव्हा तुम्ही कोणताही अंदाज बांधू शकत नाही. ही युद्धासारखी परिस्थिती आहे.
– लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद हसनैन,