करोनाचा धोका वाढला ! देशात 24 तासांत 10 हजार 158 नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली –  देशात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत आहे. नुकतेच मागील दोन दिवसांची करोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी देशात 7,830 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. आज नोंदवण्यात आलेला कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या सात महिन्यांतील देशातील सर्वाधिक आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासांत करोनाचे 1,149 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 23.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. करोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली एम्सनं रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक केले आहे. याशिवाय मुंबईत महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे.

आज राज्यात करोनाच्या 1,115 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी राज्यात 919 रुग्णांची नोंद झाली होती तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात 5,421 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या मुंबईत असून पुण्यात 776 सक्रिय रुग्णसंख्या आहे. वाढती करोना रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. याप्रकरणी काल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी प्रौढांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले आहे.