पुणे जिल्हा | बँकांच्या विकासात रिझर्व बँकेची भूमिका महत्वाची

नारायणगाव (वार्ताहर) – भारताच्या आर्थिक विकासात बँकिंग क्षेत्रात होत असलेले बदल अनुकरणीय आहेत. तसेच बदल होताना भारतीय रिझर्व बँकेची भूमिका बँकांच्या विकासात महत्त्वाची आहे, असे भोसरी येथील प्रकाश महाविद्यालयाचे प्रा. सचिन पवार यांनी नमूद केले.

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या नव्वद वर्ष पूर्णत्वाकडे या विषयावर नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बोलत होते.

यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी टाकळकर, वाणिज्य संशोधन प्रमुख डॉ. जनार्दन भोसले, कला शाखाप्रमुख डॉ. शरद काफले, डॉ. अनिल काळे, श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नरचे प्राध्यापक सोनम ताजणे. सारिका बनकर, जयश्री कानसे व ओंकार मेहेर उपस्थित होते.

प्रा. सचिन पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचार हे अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडविणारे आहेत. रिझर्व बँकेने मागील नव्वद वर्षात केलेले कार्य आणि बँकांच्या विकासात व भारताच्या आर्थिक विकासात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत बँका निर्मितीचा प्रवास, स्थापना, उत्क्रांतीचे ऐतिहासिक टप्पे, बँकिंग व वित्तीय सुधारणा 1991, 1998 काळातील नरसिंहम कमिटी, बँकिंग संदर्भातील सुधारणात्मक शिफारशी, बँकिंग विकास व अद्यावत तंत्रज्ञान, मध्यवर्ती बँक म्हणून भूमिका, भारतीय चलनाची सद्य परिस्थिती, डिजिटल करन्सी याबद्दल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी अर्थशास्त्र आणि बँकिंग विषयाचे अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र विभागांतर्गत आयोजित विशेष उपक्रमाचे माहिती दिली, तर भारतीय रिझर्व बँक आणि भारताचा आर्थिक विकास यांचा सहसंबंध प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जगताप यांनी तर आभार संकेत वामन यांनी मानले.