इयत्ता अकरावी प्रवेशाची लगबग अन्‌ धावपळ

पुणे – पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील ३३६ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अॉनलाइन नोंदणीद्वारे १ लाख १० हजार ७३ एवढ्या प्रवेशाचा जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग अन्‌ धावपळ सुरू आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल लवकर लावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाची अकरावी प्रवेशासाठी पुरेशी तयारी नव्हती. दहावीच्या निकालानंतर केंद्रीय अॉनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेला कशीतरी सुरुवात झाली आहे. महाविद्यालयाच्या नोंदणीसाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती, या मुदतीत महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये कॅप अंतर्गत ८३ हजार ५८३ तर कोटा प्रवेशासाठी २६ हजार ४९० याप्रमाणे प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत.

अशा आहेत जागा…

बिगर अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांसाठी कॅप अंतर्गत ८५ टक्के जागा आहेत. इनहाऊस कोटा १० टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के याप्रमाणे प्रवेशाचा कोटा ठरविण्यात आलेला आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयासाठी केंद्रीय किंवा कॅप अंतर्गत ३५ टक्के जागा आहेत. तसेच अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, इनहाऊस कोटा १० टक्के, व्यवस्थापन कोटा ५ टक्के याप्रमाणे प्रवेशाचा कोटा आहे.

व्यवस्थापन कोटा एच्छीक स्वरुपात…

अल्पसंख्याक कोटा हा केवळ कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल. इनहाऊस कोटा हा त्याच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल तर अशा माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी लागू असणार आहे. व्यवस्थापन कोटा सर्व महाविद्यालयांना एच्छीक स्वरुपात लागू राहणार आहे. कोटाअंतर्गत प्रवेश संबंधित महाविद्यालयांना गुणवत्तेनुसारच द्यावे लागणार आहेत.

५९ हजार ४४ विद्यार्थी नोंदणी…

आत्तापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ५९ हजार ४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ३९ हजार ५६० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन तो लॉक केला आहे. १८ हजार २९९ अर्जांची अॉनलाइन तर १६ हजार ८९२ अर्जांची मार्गदर्शन केंद्राद्वारे पडताळणी करण्यात आली आहे. प्रवेश अर्जाचा भाग-२ भरुन कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवीसाठी येत्या बुधवारपासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.