बीसीसीआयकडून खेळाडूंना दिवाळीपूर्वीच भेट

मुंबई – बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना दिवाळीपूर्वीच भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडूंसह स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनातही भरघोस वाढ होणार आहे. बीसीसीआयची बैठक येत्या सोमवारी होणार आहे. या बैठकीत खेळाडूंच्या सामना रकमेत तब्बल 40 टक्‍के वाढ होणार असल्याची घोषणा केली जाणार आहे. राज्य संघटनांच्या सहकार्याने स्थानिक क्रिकेटपटूंना करारबद्धही करण्यात येणार असून प्रथम दर्जा तसेच लीस्ट ए क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 50 हजार होणार आहे. टी-20 सामन्यांसाठी खेळाडूंना 25 हजार रुपये मिळतील.

सध्या खेळाडूंना रणजी करंडक व विजय हजारे स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी 35 हजार रुपये तर, सय्यद मुश्‍ताक अली टी-20 स्पर्धेतील सामन्यासाठी खेळाडूंना 17 हजार 500 रुपये मानधन दिले जाते. राखीव खेळाडूंना सामना रकमेच्या 50 टक्‍के रक्‍कम दिली जाते. सौरव गांगुली यांनी 2019 साली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर केंद्रीय करार करण्याची घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी होणार आहे.

त्याचबरोबर करोनाच्या धोक्‍यामुळे रणजी स्पर्धेचा गेल्या वर्षीचा मोसम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे खेळाडूंना नुकसानभरपाई म्हणून सामना रकमेच्या 50 टक्‍के रक्‍कम देण्यास बीसीसीआयच्या समितीने मंजुरी दिली असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.

महिला क्रिकेटपटूंनाही दिलासा

भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रमुख स्पर्धांमध्ये खेळत असलेल्या महिला क्रिकेटपटूंनाही त्यांच्या सामना रकमेत भरघोस वाढ दिली जाणार आहे. सध्या महिला क्रिकेटपटूंना प्रत्येक एकदिवसीय सान्यासाठी 12 हजार 500 रुपये तर, टी-20 साठी 6 हजार 250 रुपये मानधन दिले जाते. त्यातही आता 25 ते 40 टक्‍के वाढ होणार आहे.