पिंपरी | आंब्याचा मोहर गळू लागला

कान्हे, (वार्ताहर) – बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहर गळू लागला असून आंबा बागायत शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन हंगामात संकट ओढवल्याने बागायतदार विवंचनेत आहेत.

सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी भाजून काढणारे ऊन असे वातावरण सध्या मावळ परिसरात आहे. या बदत्या वातावरणाचा फटका आंबा पिकालाही बसू लागला आहे. मावळ तालुक्यासह अनेक भागांमध्ये सध्या आंबा पीक चांगले भरून आले. तर काही ठिकाणी आंब्याला मोहर आला होता.

मात्र, या बदलत्या वातावरणामुळे काही ठिकाणचा आंबामोहर गळून गेल्याने शेतकऱ्यांरी चिंता वाढत आहे. मागील काही दिवसांपासून आभाळ येऊन काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे आलेला मोहर गळून पडल्याने सध्या मावळ तालुक्यात आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

नाणे मावळ, अंदर मावळ, पवन मावळ येथे आंबा उत्पादन केले जाते. मात्र, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वातावरण असेच राहिल्यास मोठ्या प्रमाणात आंब्यावर मोहर गळती होण्याची भीती नायगावचे शेतकरी महेश चौधरी यांनी व्यक्त केली.