पुणे | ज्येष्ठ दाम्पत्याची सायंकाळ अखेर हक्काच्या घरात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आयुष्यभर कष्ट करून स्वकमाईतून घर बांधले. मुलाला उच्च शिक्षित केले. मुलाचे थाटामाटात लग्नही केले. परंतु, लग्नानंतर मुलाचे अन्‌ सुनेचे बिनसले. न्यायालयात घटस्फोटाची केस सुरू झाली. या वादाला कंटाळून मुलगा परदेशात वास्तव्यास गेला.

त्यातून सुनेने सासू-सासरे आणि पतीच्या विरोधात खटला दाखल करीत सासऱ्यांनी कष्टातून बांधलेल्या घरावर बेकायदेशीर कब्जा केला. सासऱ्यांची दाखल दाव्याची दखल घेत तीन महिन्यांच्या आत सुनेने सासऱ्याच्या प्रॉपर्टीवरचा ताबा सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने ज्येष्ठ दाम्पत्याची सायंकाळ हक्काच्या घरात सुखाने जाणार आहे. पिंपरी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एस.वानखेडे यांनी हा निकाल दिला.

प्रकाश आणि मधुरा कुलकर्णी ( नाव बदललेले) यांनी हे स्वतःच घरकुल तयार केले. प्रकाश यांनी एका कंपनीत दिवसरात्र काम करून निवृत्त झाल्यावर जागा घेत तेथे दुमजली घर बांधले. मधुरा यांनीही छोटी-मोठी कामे करून संसाराला हातभार लावला. मुलाला कष्टाने इंजिनिअर केले. त्याचे लग्नही थाटामाटात केले. उच्चशिक्षित सून घरी आली.

मुलाचा संसार सुखाने सुरु असताना वाद विकोपाला गेले. सुनेने सासू-सासरे आणि पती विरुद्ध छळवणूक आणि घटस्फोटाच्या द्वेषापोटी गुन्हे दाखल केले. सुनेच्या नावावर स्वत:चा वेगळा फ्लॅट असूनही सुनेने सासऱ्यांनी बांधलेल्या घराचा ताबा घेतला. मुलगा परदेशात असल्याने ज्येष्ठ दाम्पत्यांची फरफट सुरु झाली. या ज्येष्ठ आणि आजारी दाम्पत्याने अड. वैभवराव धायगुडे पाटील यांच्यामार्फ़त पिंपरी न्यायालयात दावा दाखल केला.

यावर तीन महिन्याच्या आतमध्ये घराचा ताबा सोडण्याचे आदेश न्यायालयाने सुनेला दिले. या प्रकरणात अड. संदीप कुडते, अड. बलराज सपाटे, अड. राहुल कुंजीर, अड. प्रथमेश बोबडे आणि अड. प्रतीक्षा कांबळे यांनी सहकार्य केले.

गेल्या सहा वर्षांपासून ज्येष्ठ दाम्पत्य हक्काच्या घराची लढाई लढत होते. रक्ताच्या नात्यात होणारे आरोप, त्यावरील युक्तिवाद या गोष्टी मन हेलावणा-या होत्या. अखेर ही केस जिंकून दाम्पत्याला न्याय मिळवून दिला याचा आनंद आहे. – अड. वैभवराव धायगुडे पाटील, ज्येष्ठ दाम्पत्याचे वकील