नव्या स्ट्रेनविषयी केजरीवालांच्या ‘त्या’ ट्विटला सिंगापूरच्या दूतावासाचे उत्तर; म्हणाले,…

नवी दिल्ली : जगभरात सध्या करोनच्या वेगवेगळ्या लाटांनी सर्वांना हैराण करून सोडले आहे. त्यातच आता सिंगापूरमध्ये नवीन स्ट्रेन आल्याची चर्चा सुरु आहे. त्यात ‘सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूचे नवीन रुप मुलांसाठी खूप घातक असल्याचे  सांगितले जात आहे,’ असे  म्हणत यामुळे करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिला होता.त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले होते. केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटवर थेट सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने उत्तर देत कोविडचा नवीन स्ट्रेन भारतातीलच असल्याचे  म्हटले  आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक ट्विट करत केंद्र सरकारचे  लक्ष वेधले होते. सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन विषाणू आढळून आला असून, तो लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगण्यात येत आहे, असे म्हणत केजरीवालांनी सिंगापूरसोबतची हवाई वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांच्या ट्विटवर सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने ट्विट करून उत्तर दिले आहे.

केजरीवाल यांचे ट्विट रिट्विट करत सिंगापूर दूतावासाने कोविडच्या नव्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या मुलांसहित अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोविड विषाणूंचा संसर्ग झाला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झालं आहे. या विषाणूची निर्मिती भारतातच झालेली आहे,” असे सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने म्हटले आहे.

करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी जीवघेणा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट केले होते. “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचे सांगितले जात आहे. भारतात हा विषाणू तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, की, सिंगापूरसोबतची हवाई प्रवासी सेवा तत्काळ रद्द करण्यात यावी. लहान मुलांसाठी लसींच्या पर्यायांवर प्राधान्यक्रमाने काम करण्यात यावं,” असे केजरीवाल म्हणाले होते.