स्नेहछाया प्रकल्पात भरते दररोज शाळा; राज्यात मात्र ऑनलाइन शाळेलाही सुटी

चऱ्होली – करोनामुळे मागील दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेची पायरी न ओलांडता ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय सर्वांनी स्वीकारला आहे. परंतु सध्या ऑनलाइन शाळांनादेखील सुटी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही स्नेहछाया प्रकल्पातील मुलांची शाळा अविरतपणे सुरू आहे.

स्नेहछाया सामाजिक प्रकल्पाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे व सारिका इंगळे यांनी हा शिवधनुष्य लीलया पेलला आहे. मुलांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू न देता परिवारातील मुलांचे शिक्षण नियमित सुरू आहे. इच्छाशक्ती असेल तर अभ्यासाला आधुनिक यंत्र लागतात हा समज ही त्यांनी खोडून काढला आहे.

प्रकल्पात आत्महत्या शेतकरीग्रस्त कुटुंबातील ऊसतोडणी कामगार, आर्थिक दुर्बल घटकतील, आदिवासी पाड्यावरील, एक पालक असलेली निवासी मुलांची जबाबदारी इंगळे दाम्पत्यांनी
घेतली आहे.

येथे दररोज मुलांना शालेय शिक्षणासोबतच जनरल नॉलेज, पाढे, शुद्धलेखन, चित्रकला, वक्तृत्व, निबंधलेखन, अंताक्षरी, बालनाट्य, किचन गार्डन संगोपन, वृक्ष संवर्धन, सेंद्रिय खत निर्मिती, घरगुती कचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, बेस्ट फ्रॉम वेस्ट, प्राण्यांचे संगोपन, कुकिंग, कराटे, योगा, रोपवाटिका व्यवस्थापन, प्राणायाम, संगणक, बोधकथा असे सर्व धडे दिल्या जातात. तर लहान लहान कृतीद्वारे कौशल्य विकास, स्वावलंबन, समाजभान, राष्ट्रभक्ती, मानवता, स्वयंशिस्त व श्रमसंस्काराचे धडे दररोज देणे सुरूच आहे.

Leave a Comment