उन्हातली खिडकी

एखाद्या लहानग्याला आई रागवली की त्या लेकराला त्याची एखादी लाडकी आत्या, काका, मावशी पटकन जवळ घेऊन म्हणतात, थांब आईचं घर उन्हात बांधूया. मला फार कौतुक वाटतं या लोकांचं. घर उन्हात बांधणार म्हणजे नक्‍की काय करणार? घर उन्हात बांधल्यावर शिक्षा घराला की घरात राहणाऱ्या माणसाला? ही उन्हात राहण्याची शिक्षा की सावलीत राहण्याची? मला जी. ए. कुलकर्णी आणि त्यांची खिडकी नावाची कथा आठवते अशावेळी. ती उन्हातली खिडकी आतल्या माणसाला सावल्यांचे खेळ दाखवते.

बाहेरून जाणाऱ्या साऱ्या सजीव, निर्जीव सावल्या खिडकीच्या पडद्यांना बाजूला करत आतल्या भिंतींवर हजेरी लावून जातात. तेवढेच एक जिवंतपणाचे लक्षण आणि खूणही. कधीकधी आतल्याच काही सावल्याही दिसतात भिंतींवर. पण त्या मोजक्‍या आणि दुर्मिळ वेळीच्या. खिडकी मात्र आपले स्थितप्रज्ञ वर्तमान सांभाळत स्थिर उभी राहाते. ऊन-सावलीच्या सीमेवरील दुभाषी असल्यासारखी तिची जागा ती सांभाळते.

रस्त्याकडेला उन्मळून पडलेल्या झाडाचे खोड जसे स्थिर असते आपल्या सुख-दुःखांपासून समान अंतरावर. उन्हाने सुकलेली त्याची त्वचा असो अगर पावसाच्या थेंबांनी त्याच्यात रुजवलेली नवी पालवी. ते झाडाचे खोड अशाच स्थिरतेच्या सीमेवर ठाम. शुष्क पानगळ आणि ओलाव्याची पालवी त्याला सारं सारखंच.

कोणी येतील त्या खोडाला कापून जळणासाठी नेतील नाहीतर एखाद्या बागेत त्याच्यावर शिल्प कोरून बागेची शोभा वाढवण्यासाठी त्याला ठेवलं जाईल. त्याच्यासाठी दोन्ही सारखंच. उन्हातली खिडकीही तशीच मग ती बाहेरून उघडणारी असो वा आतून ती उन्हाला सावली देते आणि सावलीला उन्हाची ऊब.

एखाद्याचं पूर्ण आयुष्य शुष्क उन्हाळ्यासारखं असतं. अशी माणसं स्वतः ऊन झेलत दुसऱ्यांना सावली देत असतीलही, पण सावली देता देता ती नकळत एखाद्याचं रुजणंच थांबवत असतील तर? म्हणतात, महावृक्षांची बाळं त्यांच्या सावलीत झाकोळतात. अनेकांना सावली देता देता आपलीच पुढची पिढी खुरटलेली त्यांच्या नशिबी येते आणि ही अशी भोगावी लागणारी होरपळ वाटून घ्यायलाही त्यांच्या सोबत कोणी नसते. असले तरी ही धग ते वैयक्‍तीकच ठेवतात उलट दुप्पट वेगानं सावली देत सुटतात. ही उन्हातली खिडकीही तशीच… स्वतः उन्हानं पोळत सावली देते आतल्यांना. बाहेर कितीही ऋतू बदल होवोत, ऊन असो, पानगळ, वावटळ नाहीतर पाऊस ही उन्हातली खिडकी भिंत होऊन उभी राहते मधे. स्वतः अद्वैताची सखी असूनही द्वैतपण सांभाळणारी.

शांताबाईंची कविता आहे-
तिथे एक झाड आहे,
त्याचे माझे नाते…
वाऱ्याची एकच झुळूक
दोघांवरूनही जाते..

शेजारी असणारे झाड आणि मी यांच्यात केवळ एकच साम्य आहे, वाऱ्याची एक झुळूक त्याला मला समान स्पर्शून जाते. हे द्वैत अद्वैत भाव त्या खिडकीलाही कळले असावेत कदाचित. म्हणून “इदं न मम’ असे म्हणत ती उन्हात तेवढीच रमत असेल जेवढ्या ओढीने आपल्या आतल्या सावलीत रमते.

मानसी चिटणीस

Leave a Comment