तालिबान जगाशी संवाद साधण्यासाठी उत्सुक

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील तालिबानी शासनाला मान्यता मिळावी यासाठी जगासाशी संवाद साधण्यास तालिबान उत्सुक आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानने आयोजित केलेल्या ट्रोल्का प्लस या परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. अफगाणिस्तानला वेगळे टाकण्याच्या पूर्वीच्या चुका आंतरराष्ट्रीय समुदायाने पुन्हा करू नये. त्या चुकांमुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या असेही कुरेशी म्हणाले.

या ट्रोल्का प्लस परिषदेला पाकिस्तान, चीन, रशिया आणि अमेरिकेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तालिबान सरकारला मान्यता कशी मिळवून दिली जाऊ शकेल, या हेतूनेच ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारताने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने ही परिषद आयोजित केली आहे. भारतातील परिषदेला पाकिस्तान आणि चीनचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले होते.

अफगाणिस्तान सध्या आपत्तीत आहे. तेथे सध्या वेतनही दिले जाऊ शकत नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारवर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मानवतावादी भूमिकेतून मदत करावी. अफगाणिस्तानचा गोठवलेला निधी खुला करावा, असे आवाहनही कुरेशी यांनी केले. एकट्या अमेरिकेनेच अफगाणिस्तान सेंट्रल बॅंकेचा 9 अब्ज डॉलरचा निधी गोठवला आहे.

अफगाणिस्तानातील प्रबारी परराष्ट्र मंत्री आमिकर खान मुत्तगी हे याच निमित्ताने पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चेतही ते सहभागी होणार आहेत. ट्रोल्का प्लस परिषदेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचीही ते भेट घेणार आहेत.