हतबल आईची दुर्दैवी कहाणी! मुलीच्या उपचारासाठी काळजावर दगड ठेऊन केली दीड वर्षाच्या मुलाची विक्री

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत हालाख्याची झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी लोक धडपड करताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. तसेच महिलांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि दयनीय झाली आहे.अफगाणी महिलांच्या नरकयातना सुरु झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

एका आईवर मुलीच्या उपचारासाठी चक्क आपला मुलगा विकण्याची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे.  मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून एका महिलेने स्वतःच्या मुलाला विकले आहे. टोलो न्यूजने याविषयी माहिती दिली आहे.  या महिलेने पोटच्या मुलाला फक्त काही हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आपल्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलाला काळजावर दगड ठेवत विकून टाकले. लैलुमा असे या महिलेचे नाव असून काबुलच्या तंबूमध्ये ती राहते. मुलीचा जीव वाचवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठलाही उपाय तिच्याकडे नव्हता असे  तिने म्हटले आहे. देशातील लोक आपल्याकडे असलेल्या वस्तू विकून अन्नधान्य खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी माजली आहे. देशात अन्नधान्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. आपल्या मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत आणि मुलांना सुरक्षित निवारा देण्यासाठी घरंदेखील नाहीत. अनेक नागरिक सध्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये राहत असून प्रचंड हालअपेष्टा सहन करत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये नागरिकांना कडाक्याच्या थंडीत कुठे आणि कसं राहायचं, हा प्रश्न सतावतो आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक नागरिक विस्थापित झाले असून ते छावण्यांमध्ये राहत आहेत. यामध्ये मुलांचे मात्र प्रचंड हाल होत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.