आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार

शेवगाव – लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांनी राष्ट्रवादीची पताका जिल्ह्यात सर्वांत आधी आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे आपण सर्व राष्ट्रवादीचे एकनिष्ठ पाईक आहोत. असे सांगून सर्व प्रथम अनेकांच्या मनात आजच्या मेळाव्याबद्दलचे मळभ दूर करून राजकारणात कितीही संकटे आले तरी जनतेची सेवा करण्याचा वारसा कायम राहणार आहे. आता थांबायचे नाही.

आगामी काळात येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवायच्या, असा निर्धार माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केला.
ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील घुले यांच्या अध्यक्षतेखाली आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात माजी आ. घुले बोलत होते. मेळाव्यास राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्रदेश सरचिटणीस केदारेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, अरुण पाटील लांडे, रामनाथ राजपुरे, राजेंद्र दौंड, कैलास नेमाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आ. घुले म्हणाले की, शेवगाव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना दीर्घकाळ रेंगाळली आहे. बाह्यवळण रस्त्याची समस्या कायम आहे. हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्याने तालुका विकासाबाबत 15 ते 20 वर्ष मागे गेल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्यामुळे आता परिवर्तन झाल्याशिवाय तरणोपाय नाही. या जिद्दीने कार्यकर्त्यांनी पेटून उठावे, असे आवाहन त्यांनी केले.

ढाकणे म्हणाले की, आम्हाला सुसंस्कृतपणाचा वारसा असल्याने आम्ही कोणाविरुद्ध बोलणार नाही. परंतु आमच्या हक्काचे आमच्या हातातून हिसकावून घेतले, तर शांत बसणार नाही. या पुढील काळात मतदारसंघात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम होईल, असे ते म्हणाले. माजी सभापती डॉ. क्षितिज घुले म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रवादीची बॅटरी म्हणून आमची ओळख असल्याने जिथे संकट गंभीर तेथे राष्ट्रवादी खंबीर या न्यायाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रचनात्मक कार्यासाठी कार्यरत राहण्याची भूमिका घेणे आवश्‍यक आहे. माजी आ. पांडुरंग अभंग यांनी उद्या मुंबईला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हा सहकारी बॅंकेत झालेल्या गद्दारीबदल कारवाई करण्याबाबतची स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवारांसमोर मांडू, असे सांगितले.

या वेळी नंदू मुंडे यांची राष्ट्रवादी युवकच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे यांनी स्वागत केले. जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रास्ताविक केले. नितीन पारनेरे, शिवशंकर राजळे, संजय फडके, मन्सूर फारुकी, काकासाहेब नरवडे, नीलेश गायकवाड, संतोष जाधव, समीर शेख, रामराव चव्हाण, अशोक जमधडे, दिलीप लांडे, दीपक बटुळे, ताहेर पटेल, बद्रिनाथ भडके, बाळासाहेब ताठे, मयूर वैद्य आदींनी विचार व्यक्त केले. दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. भाऊराव भोंगळे यांनी आभार मानले.

जिल्हा सहकारी बॅंक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी आ. चंद्रशेखर घुले यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यातच आजच्या मेळाव्यात चला, परिवर्तनाचे साक्षीदार होऊया अशी पोस्ट समाज माध्यमांतून व्हायरल झाल्याने घुलेंच्या मनात नेमके आहे काय? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाल्याने आजच्या मेळाव्याकडे तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मेळाव्यास प्रचंड गर्दी झाल्याने उत्सुकता वाढली होती. मात्र, घुले यांनी राष्ट्रवादीमागे शक्ती कायम राहणार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

 

आजपासून संघर्ष यात्रा
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा होतात. त्यासाठी कोट्यवधींचा विकास निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले जाते. मात्र, कोठेही विकास झाल्याचे चित्र दिसून येत नाही. त्यामुळे उद्या (बुधवार)पासून मतदारसंघात संघर्ष यात्रेला सुरुवात करण्याचा निर्धार चंद्रशेखर घुले यांनी केला. त्याचा नारळ ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील घुले, माजी आ. पांडुरंग अभंग, संदीप वर्पे, ऍड. प्रताप ढाकणे यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

भाकरी फिरविण्याचा निर्धार
जिल्हा बॅंक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर माजी आ. घुले यांच्या भूमिकेकडे तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, आज झालेल्या संवाद मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे सांगत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असून, आगामी 2024 विधानसभेच्या निवडणुकीत भाकरी फिरविण्याचा निर्धार माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मंगल कार्यालय खचाखच!
मी येतोय आपणही या अशी भावनिक साद देऊन 24 तास उलटत नाही, तोच मतदारसंघातून किमान दहा ते बारा हजारावर नागरिक या ऐनवेळच्या संवाद मेळाव्यास उपस्थित होते. मंगल कार्यालयात मॅटवर बसण्याची बैठक व्यवस्था होती. ती खचाखच भरल्यानंतर बाहेरील लॉनवरसुद्धा लोक बसले होते. तसेच मंगल कार्यालयाबाहेर पार्किंगच्या जागेत मोठा मंडप देऊन दोन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील एकही खुर्ची रिकामी नव्हती. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्क्रीनची व्यवस्था बाहेर करण्यात आली होती.