satara | खंडाळ्याचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार

खंडाळा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून खंडाळा शहरासाठी 38.33 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाली आहे. त्यामुळे खंडाळकरांचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. शामराव गाढवे यांनी खंडाळा येथे शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

खंडाळ्याची सध्याची पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या काळातील आणि अपुर्‍या क्षमतेची असल्याने नागरिकांना पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे. आमदार मकरंद पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, नवीन मंजूर योजनेसाठी वीर धरणात 0.710971 द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात शहरात पाण्याच्या टाक्या आणि वीज बचतीसाठी सौरऊर्जेवरील यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून 87 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यातून शहरात बंदिस्त गटारे, रस्ता काँक्रिटीकरण, डांबरीकरण आदी कामे होणार आहेत. जिल्हा नगरोत्थान योजनेतून 70 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा लवकरच मागविण्यात येणार आहेत.

या योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण, गटारे आदी कामे मार्गी लागणार आहेत, अशी माहिती अ‍ॅड. गाढवे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष उज्ज्वला संकपाळ, उपनगराध्यक्ष सुधीर सोनवणे, नगरसेवक संदीप गाढवे, रामचंद्र गाढवे, माजी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, सूरज मोरे, दत्तात्रय ठोंबरे, राहुल गायकवाड, जावेद पठाण, सतीश खंडागळे, बाळासाहेब गाढवे उपस्थित होते.