वर्षातून फक्त 10 दिवस विकला जाणारा जगातला सर्वात महाग बटाटा! एक किलोच्या दराने सोने घ्याल…

मुंबई – बटाट्याचा वापर जवळपास सर्व भाज्यांमध्ये केला जातो. म्हणूनच बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते, कारण तो सदाहरित असतो. बटाटा कोणत्याही भाजीत सहज मिसळतो. बटाटे बऱ्याच काळासाठी साठवले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बटाट्याची किंमत इतर भाज्यांच्या तुलनेत कमी आहे. पण बटाट्याची एक वाण आहे जी त्याला खऱ्या अर्थाने राजाची पदवी मिळवून देते.

आज आम्‍ही तुम्‍हाला बटाट्याच्‍या या अनोख्या जातीबद्दल सांगणार आहोत, जिला बाजारात 10-20 रुपये प्रतिकिलो किंमत नाही. सामान्य माणूस हा बटाटा विकत घेऊ शकत नाही कारण त्याची किंमत खूप जास्त आहे. पगार घेऊन घर चालवणाऱ्या लोकांना हा बटाटा घ्यायचा असेल तर त्यांना चक्क कर्ज घ्यावे लागेल. बटाट्याची ही व्हरायटी कोणती आणि त्याची किंमत किती?

खरं तर या बटाट्याची किंमत ऐकून तुम्ही म्हणाल की यापेक्षा सोने खरेदी करणे चांगले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी महाग होऊनही या बटाट्याला जगभरात मागणी आहे. जगातील श्रीमंत लोक हा बटाटा मोठ्या आवडीने खातात. हा बटाटा इतका महाग का असतो? याची वैशिष्ट्ये काय? चला तर, आज जाणून घेऊया.

वास्तविक बटाट्याच्या या विदेशी जातीचे नाव ‘ले बोनेट’ आहे, ज्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या बटाट्याची एक किलोची किंमत चक्क 50 हजार रुपये आहे. या बटाट्याच्या एक किलोच्या किमतीत 10 ग्रॅमच्या आसपास सोने खरेदी करता येते.

या बटाट्याची विशेष लागवड फ्रेंच बेटावर इले डी नॉयरमाउटियर इथे केली जाते. त्याची लागवड वालुकामय जमिनीवर केली जाते. समुद्री प्रवाळ हे त्याचे खत म्हणून काम करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची लागवड फक्त 50 स्क्वेअर मीटर जमिनीवर केली जाते. हा बटाटा फक्त याच बेटावर पिकवला जातो आणि बाजारात फक्त 10 दिवस उपलब्ध असतो, त्यामुळे तो इतका महाग विकला जातो.

या बटाट्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वे आढळतात, असे सांगितले जाते. या बटाट्याची साल देखील फायदेशीर आहे. हा बटाटा खाणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यात लिंबू, मीठ आणि अक्रोड यांची मिश्र चव आहे. विशेषत: या बटाट्यापासून सॅलड, प्युरी, सूप आणि क्रीम बनवले जातात.