२० इंच उंचीची जगातील सर्वात लहान गाय

ढाका –  बांगलादेशात सध्या एका गायीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे . कारण ही गाय जगातली सर्वांत चिमुकली गाय आहे . या गायीचं नाव राणी असून भुत्ती जातीची किंवा भुतानची ही 23 महिन्यांची गाय अवघी 51 सेंटिमीटर म्हणजे 20 इंच उंच आहे.या गायीचे वजन 28 किलो आहे

बांगलादेशची राजधानी ढाका शहरानजीक असलेल्या छारीग्रामजवळ एका फार्ममध्ये ही गाय आहे.जगातली सर्वांत लहान गाय म्हणून आपल्या गायीची ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी म्हणून फार्मचे व्यवस्थापक हसन हवालदार यांनी अर्ज केला आहे.

हवालदार यांनी बांगलादेशाच्या वायव्येला असणाऱ्या नावगाव परिसरातल्या एका शेतामधून गेल्या वर्षी राणीला आणलं होतं. राणीला चालण्यामध्ये काही अडचणी आहेत. तसंच ती इतर गायींना घाबरत असल्याने इतर गायी आणि प्राण्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

सध्या सर्वांत कमी उंचीच्या गायीचा विक्रम हा भारतातील माणिक्यम नावाच्या गायीच्या नावावर आहे. या गायीची खुरापासूनची उंची ही 61.1 सेंटिमीटर आहे. सर्वांत कमी उंचीच्या गायीचा विक्रम राणीच्या नावावर होऊ शकतो का, हे तपासण्यासाठी ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे अधिकारी यावर्षी भेट देण्याची शक्यता आहे.