कुस्ती निवड चाचणी शनिवारी होणार

पुणे – राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तीसरी 23 वर्षांखालील फ्री स्टाईल व ग्रीकोरोमन मुले आणि मुली यांसाठी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी दिली.

ही निवड चाचणी शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 9 ते 11 यावेळेत वजने घेण्यात येणार असून स्पर्धेस सायंकाळी 4 वाजता सुरुवात होणार आहे.

मुलांच्या फ्री स्टाईल प्रकारात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व 125 किलो तर मुलांच्या ग्रोकोरोमन प्रकारासाठी 55, 60, 63, 67, 72, 77, 82, 87, 97 व 130 किलो वजनी गट असणार आहेत. मुलींच्या लढती 50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68, 72, 76 किलो वजनी गटाच्या राहणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू पुणे शहराचा रहिवासी असणे आवश्‍यक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूचे वय 1 जानेवारी 1998 ते 31 डिसेंबर 2002 दरम्यान असावे. खेळाडूंनी सहभागी होताना 10 वी व 12 वीचे मूळ बोर्ड सर्टिफिकेट, आधारकार्ड व जन्मदाखला सोबत असणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी गणेश दांगट, अविनाश टकले व योगेश पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजीराव बुचडे यांनी केले.