कल्याणीनगर येथे महापालिकेची पावसाळी लोखंडी सहा चेंबरची चोरी

पुणे – कल्याणीनगर परिसरातून महापालिकेची सहा पावसाळी चेंबर चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुणे महानगर पालिकेच्या वडगाव क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी वैभव कांबळे (34, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर पालिकेच्या वडगाव क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 2020 मध्ये प्रभाग 5 मध्ये गलांडे उद्यानासमोर, कल्याणीनगर ते फ्लोअर वर्कस हॉटेलच्या समोर तीन लोखंडी पावसाळी चेंबर्स, कल्याणीनगर येथील ममता जनरल स्टोअर्स समोर दोन लोखंडी चेंबर्स तर पुष्पक सोसायटीच्या लेनमध्ये लोखंडी पावसाळी चेंबर्स असे एकूण सहा चेबर्स बसविण्यात आले होते.

हे चेंबर्स दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी चोरून नेल्याबाबत कल्याणीनगरमधील नागरिकांनी कळविल्याने त्यानंतर पालिका प्रशासनाने संबंधीत ठिकाणांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यालयाने बसविलेले लोखंडी पावसाळी चेंबर्स चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर ही तक्रार देण्यात आली. दरम्यान हे चेंबर नेमके कोणी चोरून नेले याचा तपास आता येरवडा पोलिस करत आहे.