…तर नाईलाजास्तव पूर्ण लॉकडाऊन : अजित पवार

पुणे – करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव पूर्ण लॉकडाऊन लावावे लागेल. ती वेळ येऊ देऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे शुक्रवारी (दि. 16) जिल्ह्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते रेमडेसिविरबाबत म्हणाले, तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविरची गरज नाही. एकूण बाधितांच्या तुलनेत जास्तीत जास्त 25 ते 40 टक्‍के रुग्णांना रेमडिसिविर इंजेक्‍शनची गरज असते. त्यामुळेच खासगी डॉक्‍टरांनी रुग्णाच्या आरोग्याची सर्व माहिती घेऊनच रेमडेसिविर इंजेक्‍शनचा वापर करावा, असा सल्ला तज्ञ देत आहेत. 

अनेक राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत लसींची तसेच रेमडेसिविर इंजेक्‍शनची निर्यात सुरू ठेवणे योग्य नव्हते. आम्ही केंद्राला विनंती केली रेमडिसिविरची निर्यात थांबवावी. त्यानुसार केंद्राने निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने रेमडेसिविर खरेदी करण्यासाठी निविदा काढली होती. परंतु एकाही कंपनीने अथवा विक्रेत्याने प्रतिसाद दिलेला नाही. तशीच परिस्थिती पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा परिषदेनेही खरेदीची तयारी ठेवली आहे. काही कंपन्यांनी केंद्राच्या सूचनेनुसार उत्पादन वाढविण्याची तयारी दर्शविली आहे.

केंद्राचे 10 व्हेंटिलेटर आले
ऑक्‍सिजनची क्षमता वाढविण्यासाठी रायगडमधील ऑक्‍सिजन प्लांटशी चर्चा सुरू आहे. त्यांनी तयारी दर्शवली असून, लवकरच याठिकाणाहून पुरवठा होईल. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हेंटिलेटर देण्याबाबत सांगितले, त्यातले 10 व्हेंटिलेटर आले असून, बाकीचे येणार आहेत. आज 25 टक्‍के करोना रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे, तर बाकीचे गृहविलगीकरण आहे. असे असताना बेडची कमतरता भासते, यावरून परिस्थिती लक्षात येते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये. संचारबंदीचे नियम काटेकोरपण पाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Leave a Comment