…तर ‘या’ परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला होईल – शरद पवार

मुंबई – केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कांद्यांच्या किमतीत वाढ होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.

शरद पवार म्हणाले कि, कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे. निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कांदा निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती शरद पवार यांनी पियुष गोयल यांना केली आहे.

यावर पियुष गोयल यांनी सांगितले की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे. यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बंगळुरु आणि कृष्णापुरम येथील कांद्यावरही निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या कांद्याच्या निर्यातीवर बंदी लावण्यात आली नव्हती. मात्र आता या कांद्याच्या बाबतीतही सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात 30 ते 40 रुपये किमतीने कांद्यांची विक्री होत आहे.

बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. करोना संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 19.8 दशलक्ष डॉलर्स कांद्याची निर्यात केली आहे.

Leave a Comment