लोकासांगे ब्रह्मज्ञान…! धनंजय मुंडेंकडून करोना नियमांची पायमल्ली; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा घाट

परळी : राज्यातील अनेक  मंत्री आणि  नेत्यांना करोनाचा विळखा बसला आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. कारण  काल  एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी करोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काल धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. यावेळी कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता. विशेष म्हणजे स्वतः धनंजय मुंडेंनी देखील मास्क घातला नव्हता.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांना नियम काटेकोरपणे पार पाडा, असे आवाहन करतात. मात्र त्यांचेच नेते नियम धाब्यावर बसवताना पाहायला मिळत आहेत.

धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “परळीतील जनक्रांती संघटनेचे युवक नेते राजाभाऊ फड यांनी त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड उत्साह आणि गर्दी होती की मलाही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सर्वांचे स्वागत.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकारमधील मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत.