वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत – खासदार सुळे

बारामती दौऱ्यावर प्रथमच परखड, वास्तव प्रतिक्रिया
बारामती/ जळोची : बारामती हे माझे माहेर आहे. आजोळ आहे. आणि माझी कर्मभूमी देखील आहे. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. या ठिकाणी वैचारिक मतभेद आहेत. मनभेद नाहीत. त्यामुळे हा विचारांचा लढा आहे. तो विचारांच्या पद्धतीने सुरू राहील, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामतीमध्ये 25 जूनपासून पवार कुटुंब आले नव्हते, अशी चर्चा होती. मात्र, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत दाखल झाले. त्यानंतर सहा दिवसांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सांत्वनपर भेटीनिमित्त दौरा केला. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

दरम्यान, दौऱ्यात खासदार सुळे यांच्याबरोबर आता राष्ट्रवादीचे कोणते पदाधिकारी, कार्यकर्ते असणार, याची उत्सुकता बारामतीसह जिल्ह्याला होती. राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी हे अजित पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत.

शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आल्यानंतर देखील या पदाधिकाऱ्यांनीही गोविंदबागेकडे पाठ फिरवली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ही उत्सुकता अधिकच ताणली होती. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिरायती भागातील लोकांना राष्ट्रवादीतील फूट आवडलेली नाही यावर मिश्‍किलपणे हास्य करीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही राजकारण करण्यासाठी नवीन समाजकारणासाठी राजकारणात आलो आहोत.

संपूर्ण पवार कुटंबांची पिढी तशीच आहे. अगदी पाहायला गेले तर शरद पवार यांच्या सख्ख्या भगिनी सरोज पाटील यांचे पती एन. डी. पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते. अर्थात ते जरी शेतकरी कामगार पक्षात असले आणि वारंवार कॉंग्रेसवर विशेषतः शरद पवार यांच्यावर टीका करीत होते. तरी शरद पवार किंवा पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाच्या नातेसंबंधात कुठलीही उणीव किंवा कमतरता आली नाही, दिसली नाही. त्यामुळे राजकारण समाजकारण आणि कुटुंब हे वेगवेगळे ठेवण्यासाठी पवार कुटुंब हे प्रगल्भ आहे.

ही जोडलेली माणसे आहेत
राष्ट्रवादी फुटल्याचे दिसते. मग अजित पवार यांच्याबरोबरही तेच कार्यकर्ते आणि तुमच्याबरोबर तेच कार्यकर्ते, असे का, असा प्रश्‍न सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता त्या म्हणाल्या की, बारामतीमध्ये कार्यकर्ते नाहीत ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. हे कार्यकर्ते नाहीत तर ही जोडलेली माणसे आहेत. प्रेमाची माणसे आहेत म्हणून ती बरोबर आहेत.

दादा- ताई यांना मानणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर दीड महिन्यानंतर शरद पवार हे गोविंदबागेत दाखल झाले. फुटीनंतर बारामती शहरासह तालुक्‍यातील पदाधिकारी हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे आगामी राजकीय दिशा प्रारंभीला वेगळे वळण घेईल, असे वाटत होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीवेळी दादा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्‍नाला बगल देत कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकारण यांच्यातील फरक परखडपणे स्पष्ट केला आहे. त्यामुळे तालुक्‍यातील जनता दादा आणि ताई यांना मानणार, हे स्षष्ट दिसत आहे, अशी चर्चा सुरू होती.