पिंपरी | कामशेत- जांभवली रस्त्यावर जागोजागी खड्डे

नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील नाणे मावळातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कामशेत- जांभवली मार्ग अंत्यत खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, नाणे गावातील शेजारील येथे रस्ता मधोमध अपूर्ण ठेवला आहे. अपूर्ण रस्ता व रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

नाणे मावळातील नाणे हे एकमेव ठिकाण असल्याने या- ना त्या कामानिमित्त दररोज ग्रामस्थ व नाणे मावळात येणारे पर्यटन ये- जा करीत असतात. नाणे मावळातील परिसरातून नोकरी व व्यवसायानिमित्त मावळ तालुक्यात अथवा तालुक्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवासाची संख्या लक्षणीय आहे. मात्र, रस्ता खराब झाला असल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे.

ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच नाणे मावळातील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज जात असतात. त्यांनाही त्याचा त्रास होतो. सध्या उन्हाळी सुट्टी असून, सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी अनेकांनी विविध ठिकाणी ये -जा करतात.

मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघात घडत आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंचवटा असल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात वाहने आढळून अपघात घडत आहेत. तसेच वाहनांचेही मोठे नुकसान होत असून, वाहने खिळखिळी झाली आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वेगाने येणारी वाहने येथे आदळून वाहनावरील चालकाचा ताबा सुटून अपघात घडत आहेत.

साइडपट्ट्या खचल्या
कामशेत- जांभवली रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पाइपलाइनसाठी हा रस्ता खोदला आहे. तर साइड पट्ट्या खचल्या असून, वाहने एकमेकांसमोर येऊन वादावादीचे प्रसंग घडत आहेत. साईडपट्या खचल्याने दुचाकी घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार केली जात असून प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.