थंडी-पावसाच्या खेळानंतर वाढणार तापमान ! देशातील वातावरणात पुन्‍हा बदल होण्‍याची शक्‍यता

नवी दिल्ली – देशासह महाराष्‍ट्रात काही दिवसांपासून थंडी आणि पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असल्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यासह देशातील नागरिकांना अवकाळी पाऊस आणि थंडीपासून दिलासा मिळणार आहे. पुढील 6 ते 7 दिवस तापमानात किंचित वाढ पाहायला मिळणार असून शनिवारपासून दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये तापमान 20 अंशांवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर तापमानात यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते, अशी माहिती देखील देण्यात आली आहे. त्याशिवाय, पहाटे आणि रात्री थंडीचा प्रभाव दिसून येईल. पर्वतीय भागातील कमी बर्फवृष्टीमुळे यावेळी हिवाळा जास्त काळ टिकणार नाही, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, उत्तर राजस्थानमध्ये सकाळी काही ठिकाणी दाट ते दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दाट धुके पडू शकते. पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची शक्यता आहे.

उत्तर भारतात आज आकाश निरभ्र असेल. सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल. उत्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

बदलत्‍या हवामानामुळे नागरिक त्रस्‍त
या हवामान बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तर हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारांचाही पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम देशातील हवामानावर पाहायला मिळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.